३१ ऑगस्टची मुदत जवळ आल्याने अध्यक्षांसमोर पेच
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जिल्हा परिषदेतील निधी वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गंभीर बनला असून, आता निधीच्या नियोजनावरून सत्ताधारी भाजपमध्येच उघड अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा आहे. पक्षांतर्गत दोन गट पडल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या
समोर पेच निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांमधील या वादामुळे ३१ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी निधी नियोजनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर होणार की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला मंजूर झालेल्या निधीच्या नियोजनासाठी
२१५ कोटींचा विकास आराखडा केला सादर
मंगळवारी (दि. २५) विशेष सभा घेण्यात आली. अध्यक्ष गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत २१५ कोटी ८३ लाख ५९ हजार रुपयांचा विकास आराखडा सादर करण्यात आला. चर्चेनंतर आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून, ३० तारखेपर्यंत प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे नियोजन आहे.
मात्र, सभेत सदस्या विद्या रमेश गायकवाड यांच्यासह काही सदस्यांनी डीपीसीच्या निधीपैकी ४० टक्के निधी पालकमंत्र्यांसह आमदारांना देण्याच्या चर्चेला विरोध केला. गायकवाड यांनी हा निधी जनतेच्या विकासासाठी असून, तो कोणत्याही राजकीय नेत्याच्या मालकीचा नसल्याचे सांगितले.
भाजपमध्ये अंतर्गब बैठका
या विशेष सभेतून निधी वाटपाचा प्रश्न सुटेल, अशी जि.प. अध्यक्षाची धारणा होती. मात्र, सभेनंतर निधी वाटपावरून सत्ताधारी भाजमध्येच दोन गट पडल्याने अध्यक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत. यामुळे मागील दोन दिवसांपासून भाजपमध्येच अंतर्गत बैठका सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. अध्यक्ष गलांडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सेनेला भाजपच्या बरोबरीने हवा हिस्सा
राज्यात महायुती असतानाही जि.प. मध्ये सत्तेपासून दूर ठेवलेल्या शिवसेनेला निधी वाटपात भाजप सदस्यांच्या बरोबरीत हिस्सा हवा आहे. तसे शिवसेनेचे गटनेते राधाकिसन पठाडे यांनी माध्यमांसमोर बोलूनही दाखवले आहे. दुसरीकडे उद्धव सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद मिटवून निधी वाटपाचे नियोजन करताना अध्यक्षांची तारेवरची कसरत सुरू आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















